छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): धनत्रयोदशीच्या निमित्ताने शहरात आज मोठा उत्साह आहे. सराफा मार्केटमध्ये खरेदीवर देखील भर दिला जात आहे. यंदा मात्र सोन्याचे दर तेजीने वाढले आहे. असे असले तरी सराफा मार्केटमध्ये जवळपास आठ कोटी ते दहा कोटींची उलाढाल होईल. अशी अपेक्षा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना व्यक्त केली आहे.
धनत्रयोदशीचा शहरात मोठा उत्साह आहे. आज घरोघरी धनत्रयोदशीची पूजा केली जाणार आहे. त्यासाठी सकाळपासूनच घरोघरी मोठा उत्साह आहे. सकाळी लवकर उठून अंगणात सडा, रांगोळ्या काढून पारंपारिकतेचे घरोघरी दर्शन घडविले. अनेकांनी पहाटे लवकर उठून दिवे लावले. यावेळी संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. आज सायंकाळी दिवे लावून धनत्रयोदशीची पूजा केली जाणार आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोन्याचे दागिने, चांदीचे, सोन्याचे शिक्के खरेदीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो. त्यातल्या त्यात लग्नसराईच्या निमित्ताने देखील अनेकजण धनत्रयोदशीचा मुहूर्त सोनं खरेदीसाठी निवडतात. ही परंपरा यंदाही कायम आहे. मात्र यंदा सोन्याचे दर पाहिले तर जणू गगनाला भिडले आहे. त्यामुळे यंदा सराफा मार्केटवर 25 टक्के परिणाम झाला आहे. असे असले तरी मागील वर्षीप्रमाणेच यंदा सराफा मार्केटमध्ये खरेदी होईल.
यंदा जवळपास आठ ते दहा कोटींची सराफा मार्केटमध्ये खरेदी होईल. अशी अपेक्षा सराफा व्यापारी वर्गाला आहे. आजचे सोन्याचे दर पाहिले तर प्युवर सोन्यासाठी 1 लाख 28 हजार 500 रुपये मोजावे लागत आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 1 लाख 18 हजार रुपये मोजावे लागत आहे. नागरिक आजच्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने, सोने, चांदीचे शिक्के पूजन करण्यासाठी घेत आहेत. तसेच अनेकजण सोन्याचे वाढते दर पाहता गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करण्यासाठी आजचा मुहूर्त अनेकांनी साधला आहे. वाढत्या दरामुळे अनेकजण आप आपल्या बजेटनुसार सोन, चांदी खरेदी करत आहेत. जिथे पाच ग्रॅम सोनं खरेदी करायचे आहे तिथे तीन ग्रॅम सोन नागरिक खरेदी करत आहेत. सोन खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी कायम आहे. परंतु ग्रॅम खरेदीवर त्याचा परिणाम झाला आहे.
चांदीनेही खाल्ला भाव
सोनच नव्हे तर चांदीनेही चांगलाच भाव खाल्ला आहे. चांदीचे दर तेजीने वाढत चालले आहे. सोन्यापाठोपाठ आता चांदीची खरेदी देखील वाढत आहे. सोन्याचे दर वाढले मात्र त्यापाठोपाठ चांदीनेही चांगलाच भाव खाल्ला आहे. आजचे चांदीचे दर पाहिले तर 1 लाख 70 हजार 500 रुपये आहे. असे असले तरी आजच्या धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत अनेकांनी चांदीचे शिक्के खरेदीवर भर दिला आहे.